नवी दिल्ली : प्रतिनिधी
मोदी सरकार GST स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे आणि सध्याचा जीएसटी स्लॅब १२ टक्क्यांवरून ५ टक्केवर आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारकडून हा निर्णय घेतला गेल्यास जीएसटी असणा-या अशा साहित्यांवर दिलासा मिळू शकतो जे विशेष करून मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असणारे लोक घरात नियमित वापर करत असतात. जे साहित्य १२ टक्के GST स्लॅबच्या अंतर्गत येते.

याशिवाय केंद्र सरकार आगामी काळात GST स्लॅबमध्ये बदल करून ४ ऐवजी ३ स्लॅब आणण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
GST कौन्सिलच्या पुढच्या ५६ व्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. ही जीएसटी कौन्सिलची बैठक या महिन्यात होण्याची शक्यता आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर आतापर्यंत १२ टक्के स्लॅबमध्ये येणा-या वस्तूंच्या किंमतीत घट होऊ शकते. सध्या बूट-चप्पल, मिठाई, कपडे, साबण, टूथपेस्ट, डेअरी उत्पादनांसारख्या अनेक वस्तूंवर सरकारकडून १२ टक्के जीएसटी आकारला जातो. २०१७ साली देशात जीएसटी लागू करण्यात आला होता.
भारतात सध्याच्या घडीला GST बाबत बोलायचे झाले तर ४ स्लॅब उपलब्ध आहेत. त्यात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे वेगवेगळे वर्गीकरण करण्यात आले आहे. धान्य, खाद्य तेल, साखर, मिठाई शिवाय सोने चांदी, अन्य साहित्यही वेगवेगळ्या कॅटेगिरीत विभागले गेले आहे.