पुणे : प्रतिनिधी
वकील आणि काळा कोट हे समीकरण ठरलेले आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करणे वकील वर्गाला जवळपास अशक्य होते.

काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. त्या अनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली असून, येत्या ३० जूनपर्यंत न्यायालयाने कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.
न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणा-या वकिलांना आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही उन्हाळ्यात काळ्या कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी यंदा १ मार्च ते ३० जून हे तीन महिने कोट न वापरण्याची मुभा दिली आहे. पुरुष वकिलांसाठी पांढरा शर्ट, काळी किंवा राखाडी रंगाची पँट, काळा टाय किंवा पांढरा बँड तर महिला वकिलांसाठी ड्रेस कोड पांढरी किंवा सौम्य रंगाची साडी, सलवार कुर्ता अथवा काळी पँट, पांढ-या शर्टवर पांढरा पँट असा पेहराव असणार आहे.