वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशाची अधिकृत भाषा इंग्रजी करण्याच्या तयारीत आहेत. त्यासंदर्भातील कार्यकारी आदेशावर ट्रम्प लवकरच स्वाक्षरी करणार आहेत. या आदेशामुळे सरकारकडून निधी मिळणा-या सरकारी संस्था व संघटनांना इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषेत कागदपत्रे व सेवा देणे सुरू ठेवायचे किंवा नाही, याची निवड करता येणार असल्याचे व्हाइट हाउसच्या अधिका-याने सांगितले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शुक्रवारी या आदेशावर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत व्हाइट हाउसने त्यासंदर्भात घोषणा केली नाही. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा आदेश रद्द होईल. संघीय संस्था, तसेच सरकारच्या निधीतून चालणा-या व इंग्रजीचा वापर करत नसलेल्या संस्थांना भाषेचे सहकार्य करण्याची तरतूद क्लिंटन यांच्या आदेशात होती. इंग्रजीला राष्ट्रभाषा म्हणून मंजुरी मिळाल्यास एकात्मतेसोबत सरकारी कामकाजातील कार्यक्षमता, तसेच नागरी सहभाग वाढण्यासाठी देखील मदत होणार असल्याचे व्हाइट हाउसने स्पष्ट केले.
अमेरिकेतील ३० हून अधिक राज्यांनी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मंजुरी देण्याचा कायदा पारित केला आहे.