नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
आयकरात मोठा दिलासा दिल्यानंतर मध्यमवर्गाला अजून एक मोठा सुखद धक्का मिळाला आहे. ‘आरबीआय’ने जवळपास ५ वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जे स्वस्त होणार आहेत. याशिवाय सध्या कर्जाचा डोईवर बोजा असणा-या कर्जदारांचा ‘ईएमआय’ पण कमी होणार आहे. त्याचा थेट परिणाम गृह, कार कर्ज आणि इतर ग्राहकांवर दिसून येईल.

यापूर्वी ४ ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान जैसलमेर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक झाली होती. त्यावेळी सुद्धा रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण कायम ठेवले होते. पण आता रेपो दर घटला आहे.
अनेक वर्षांपासून गृहकर्जावरील हप्ता कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. आरबीआय आणि पतधोरण समितीवर त्यासाठी मोठा दबाव होता. या समितीमधील काही सदस्यांनी रेपो दर कपातीचा आग्रह सुद्धा धरला होता. केंद्र सरकार पण रेपो दर कपातीसाठी आग्रही होते. पण आरबीआय हा निर्णय घेण्यास धजत नव्हते. तर संजय मल्होत्रा यांनी आरबीआय गव्हर्नरचा पदभार सांभाळताच पहिल्यांदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला.