मुंबई : khabarbat News Network
गेल्या दोन महिन्यापासून सतत चढ-उताराने हैराण झालेला गुंतवणूकदार आता देशात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात गोंधळात पडला आहे. सेन्सेक्स ११५० अंकांनी घसरुन ७८०६५ अंकांवर घसरला.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही ३६० अंकांनी घसरला आणि २४००० च्या खाली २३,६३३ अंकांवर घसरला. बँकिंग आणि ऊर्जा समभागांमध्ये मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही मोठी घसरण झाली. बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक इंडिया विक्स १३.३७ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
BSE सेन्सेक्स १२०० अंकांच्या घसरणीसह २३,६१० अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टी जवळपास ४०० अंकांनी १.६२ टक्क्यांनी घसरला आहे. कर्नाटकात ‘एचएमपीव्ही’ रुग्ण आढळल्यानंतर गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईच्या बाजार भांडवलात ९ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली. ‘बीएसई’ वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मागील सत्रात ४४९.७८ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच बाजार भांडवलात ९.०४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
मिड-कॅप, स्मॉल-कॅपला फटका
Mid-Cap आणि Small-Cap शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. Nifty चा मिड-कॅप निर्देशांक ११०३ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे तर स्मॉल-कॅप निर्देशांक ४१३ अंकांनी खाली आला. याशिवाय बँकिंग शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत असून निफ्टी १.६६ टक्क्यांनी घसरत आहे. FMCG, Energy, Healthcare, FMSG आणि Oil, Gas च्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसली.