khabarbat

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है!

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है….

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळविला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलले.

महायुतीच्या विजयात ‘लाडकी बहीण’ योजना महत्त्वाची ठरली. निवडणुकीपूर्वी चार महिने ही योजना आणत महायुती सरकारने राजकीय संदर्भच बदलून टाकले. राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत. महाविकास आघाडीने यापेक्षा जादा रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र महायुती सरकारने प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने समस्त महिलांचा विश्वास महायुतीवर अधिक बसला. संघ परिवारातील सर्व संघटनांनी एकजुटीने ‘सजग रहो’ अभियान राबविले. यात शहरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला पण, ग्रामीण भागात कीर्तनकार तसेच प्रवचनकारांनी भाजपच्या बाजूने सारी ताकद उभी केल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

‘बटेंगे तो कटेंगे’ तसेच ‘एक है तो सेफ है’ या ना-यांमुळे राज्य ढवळून निघाले. काँग्रेसने उलेमांचा घेतलेला पाठिंबा तसेच वक्फ बोर्ड धार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप सातत्याने प्रचारात झाला. सोशल मिडीयावरही हा मुद्दा चर्चेत होता. त्यावर महाविकास आघाडीने फारसे उत्तर दिले नाही. याचा परिणामही मतदारांवर झाला. शहरी-ग्रामीण भागात हिंदू मतदार जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महायुतीच्या मागे उभा राहिला. विशेषत: मुस्लिम समाजातील सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्गाला वक्फ बोर्डाच्या ‘त्या’ १७ मागण्यांचा विषय रुचलेला नव्हता. या वर्गाने थेट भाष्य केले नाही, मात्र ‘एक है, तो सेफ है’च्या छत्राखाली एकत्र येत आपल्या मतदानातून भूमिका दाखवून दिली. एकुणात सकल हिंदूच्या सोबतच मुस्लिम समुदाय सामाजिक धु्रुवीकरणाला बगल देत एकवटल्याचे दिसून आले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-या मनोज जरांगे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना अश्लाघ्यपणे लक्ष्य केले. मात्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी काय काम केले हे सातत्याने नमूद केले. उमेदवार निवडीपासून ते प्रचारापर्यंत सूक्ष्म नियोजन केले.

राज्यातील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले होते. जरांगे यांनी उमेदवार जाहीर करण्याबाबत धरसोड वृत्ती दाखविली. त्याचबरोबर काही मुस्लिम धर्मगुरूंना बरोबर घेत मोट बांधण्याचे त्यांनी जाहीर केले. नेमके हे महाविकास आघाडीला भोवले. यातून ‘ओबीसी’ मतांचे ध्रुवीकरण झाले. ही एकगठ्ठा मते महायुतीला गेली. राज्यात ३० ते ३५ टक्के ओबीसी असल्याचे सांगितले जाते. हा मतदार भाजपच्या मागे उभा राहिला. विदर्भात भाजपने ६२ पैकी ४५, मराठवाड्यात ४६ पैकी १५ जागा जिंकल्या. पश्चिम महाराष्ट्रातही २० जागांवर झेंडा रोवला.

मुळात शहरी मतदार हा महायुतीला अनुकूल मानला जातो. राज्यात ४० टक्के जागा शहरी-निमशहरी आहेत. त्यातील ९५ टक्के जागा महायुतीने जिंकल्या. मेट्रो, उड्डाणपूल, मोठे प्रकल्प आणि त्याला हिंदुत्वाची जोड यामुळे शहरांत महायुतीने मोठे यश मिळवले. मुंबईसारख्या ठाकरे गटाच्या प्रभावक्षेत्रात भाजपने मुसंडी मारली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पुण्यातही बहुतेक सर्व जागा महायुतीच्या पदरात पडल्या. भाजपचे हे यश पाहता राज्यात भाजपकेंद्रित राजकारण या पुढील काळात राहील हे स्पष्ट आहे. त्रिशंकु स्थिती असती तर, अस्थिरतेचा धोका होता. मात्र आता भाजपने देशातील सर्वात श्रीमंत राज्यावर सत्ता राखली आहे. याचे भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम नक्कीच होतील.

कॉँग्रेसचे काय चुकले…
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे ‘अतिआत्मविश्वास’ बळावलेल्या काँग्रेसला विधानसभेत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. तब्बल १०१ जागा लढवल्या असल्या तरी २० जागाही जिंकता आलेल्या नाहीत. काँग्रेसला नसलेला राज्यातील चेहरा, अदानी आणि राज्यघटना या सहज जनतेत न मुरणा-या मुद्द्यांभोवती घुटमळणारा प्रचार, तिकीट वाटपात प्रस्थापित नेत्यांनी आपल्या बगलबच्च्यांची लावलेली वर्णी, नाना पटोले यांच्यासारखे आवश्यक कुवत नसलेले प्रदेशाध्यक्ष, मुंबईत केवळ आपल्या बहिणीपुरते काम करणा-या वर्षा गायकवाड… अशी अनेक कारणे या पराभवामागे आहेत.

देशभरात निवडणुकांमध्ये थेट भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढल्यास पराजयच पदरी येतो हे वारंवार सिद्ध होऊनही काँग्रेसच्या हायकमांडपासून ते गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत शहाणपणा येत नाही. हेच महाराष्ट्र विधानसभेत त्यांचा झालेला पराभव व झारखंडमध्ये जेएमएमच्या नेतृत्वाखाली झालेला विजय यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपने व्होट जिहाद, बटेंगे तो कटेंगे… या मुस्लिम विरोधात केलेल्या प्रचाराला थेट व स्पष्ट प्रत्त्युत्तर देण्यासही काँग्रेस नेतृत्व घाबरले.

काँग्रेसने मौलाना सज्जाद नोमानींसारख्या देवबंदच्या मौलांनाचा पाठिंबा घेतल्याने लोकसभेत मिळालेल्या हिंदू मतांमधील काही टक्का नाराज झाला. बौद्ध समाजाला चांगले प्रतिनिधित्व दिले मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या प्रहाराविरोधात एकही नेता भूमिका घेताना दिसला नाही. त्यामुळे कॉँग्रेसचे ‘पाणी-पत’ झाले.

– श्रीपाद सबनीस । s4shripad@gmail.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »