२२ मतदारसंघातील बाजीगरांच्या हाती सत्तेची चावी…
संभाजीनगर : khabarbat News Network
महाराष्ट्राची यावेळची विधानसभा निवडणूक आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात वेगळी आहे. तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्या, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एआयएमआयएम, मनोज जरांगे पुरस्कृत उमेदवार असे चित्र राज्यात आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या निकालाने आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इथला निकाल महत्त्वाचा असणार आहेच, यापेक्षाही मराठवाडा सत्तेची चावी स्वत:कडे बाळगून आहे, हे उल्लेखनिय ठरावे.
‘मविआ’ला मताधिक्य, महायुती पिछाडीवर
८ जिल्हे असलेल्या मराठवाड्यात ४६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४६ पैकी ३२ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला तर महायुतीला १२ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालेले होते. शिवसेनेला (ठाकरे) १५ मतदारसंघात, काँग्रेसला १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३ मतदारसंघात आणि महायुतीतील शिवसेनेला (शिंदे) ४, भाजपला ७, राष्ट्रीय समाज पक्षाला १, तर एमआयएमला २ मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. या विधानसभा निवडणुकीत ४६ पैकी २२ मतदारसंघात काट्याची टक्कर रंगणार असून इथल्या ‘बाजीगर’ मंडळींच्या हाती सत्तेची चावी असणार आहे. लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी ५ मतदारसंघात ५ हजारांपेक्षा कमी मताधिक्य मिळालेले होते. त्याच प्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी १ मतदारसंघात ५ ते १० हजारांच्या दरम्यान मताधिक्य मिळाले. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे १० ते २० हजार मताधिक्य फक्त महाविकास आघाडीला ६ मतदारसंघात मिळाले.
आरक्षणाच्या मुद्यावरील ध्रुवीकरण
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत प्रचंड धुव्रीकरण बघायला मिळालं. मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्याला ओबीसींकडून होत असलेला विरोध… या फॅक्टरचा थेट फटका सत्ताधारी म्हणून महायुतीला बसला. मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही तसाच आहे आणि ग्रामीण भागात केंद्रस्थानी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा फॅक्टर मराठवाड्यात निर्णायक ठरणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पुन्हा मतांचे धुव्रीकरण होण्याचीच स्थिती जास्त आहे. त्यात तिसरी आघाडी, वंचित आघाडी, एमआयएम आणि बंडखोर अपक्ष यामुळे दोन्ही बाजूंची मते विभागली जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
मराठेत्तर सोशल इंजिनियरिंग
महाविकास आघाडी विरोधी बाकांवर असल्याने महायुतीला लक्ष्य करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. ते खोडण्याचे, बंडखोरी रोखून मतविभाजन टाळण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. उमेदवारांची निवड, मराठेत्तर सोशल इंजिनिअरिंग यावर भर दिला जाऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडीला लोकसभेत मराठवाड्यात चांगला जनाधार असला, तरी अपक्ष आणि इतर पक्षांमुळे विरोधी मतविभाजनाचा धोकाही जास्त आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील ४६ जागा राज्यातील सत्तेचे समीकरण बदलू शकतात.