मुंबई । Khabarbat News Network
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना कशा बंद होतील? याची संधी महाविकास आघाडी पाहत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात केला. मुंबई अॅक्वालाईन मेट्रोचे उद्घाटन आणि ठाण्यातील विकास कामांचे मोदींच्या हस्ते भूमीपूजन पार पडले. या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
ठाण्याशी बाळासाहेब ठाकरेंना विशेष ओढ होती त्याचबरोबर ठाणे शहर हे आनंद दिघेंचं शहर आहे. देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं आणि ठाण्याचं नातं होतं. त्यामुळं ठाण्याच्या विकासावर आम्ही लक्ष्य केंद्रीत केलं आहे. पण आम्हाला विकास करण्यासाठी डबल मेहनत करावी लागत आहे.
महायुती सरकारनं महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली, यात महिलांना १,५०० रुपये महिना आणि ३ एलपीजी सिलेंडर मोफत मिळत आहेत. ‘मविआ’ याचीच वाट पाहतेय की, यांना संधी मिळाल्यास ते सर्वात आधी शिंदे यांच्यावर राग काढतील आणि त्यांनी आणलेल्या योजनांना टाळं लावून टाकतील. हा पैसा बहिणींच्या हातात नको तर त्यांच्या दलालांच्या खिशात जावा असे वाटत आहे, अशा घणाघाती शब्दांत मोदींनी मविआ आणि प्रामुख्याने काँग्रेसवर निशाणा साधला.