मुंबई | khabarbat News Netork
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : राज्यातल्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांसाठी योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.
१,५०० रुपये म्हणजे नाममात्र असून ही लाभार्थ्यांची थट्टा असल्याची टीका विरोधक करतात. लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरुन सरकारवर टीका होत असली तरी एका बहिणीने याच पैशांमधून एक व्यवसाय उभा केला आहे. या छोट्याशा व्यवसायातून तिने केवळ १० दिवसांमध्ये १० हजार रुपये कमावले आहेत. या बहिणीचे नाव आहे प्रणाली बरड.
प्रणाली यांनी इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये असलेली घुंगरु-कडी खरेदी केली होती. गणपती बाप्पाची आरती करताना ही रिंग वापरण्याचा ट्रेंड आला आहे. हाताच्या बोटात रिंग आणि रिंगला लगडलेले घुंगरु. अशी रिंग बघून प्रणाली यांना एक कल्पना सुचली. त्यांना अशा रिंग खरेदी करून त्याची विक्री करायचे ठरविले. त्यामुळे प्रणाली बरड यांना १० दिवसांमध्ये १० हजार रुपये कमावता आले. प्रणाली यांनी स्वत: मुंबईतल्या परळ, दादर, लालबाग मार्केट, गौरीशंकर बाजारपेठ या भागांमध्ये विक्री केली.