भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव हाच ‘गण गण गणात बोते’ या प्रासादिक मंत्राचा गर्भितार्थ आहे. तात्पर्य, पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वराला पहायला हवे. तो आपल्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे हे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वत: देखील वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. हीच शिकवण शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांनी दिली. आणि नेमके हेच तत्त्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे,
ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन:।
मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।
सारांश, या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे. या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो. म्हणूनच तर आपण म्हणतो, जिवा-शिवाची भेट झाली. किंबहुना भेटीची आस लागली. ही ओढ म्हणजेच ‘गण गण गणात बोते’ अर्थात जीवात्मा आणि परमात्मा यांची भेट होणे.
– श्रीपाद सबनीस
9960542605