गुमी : दक्षिण कोरियातील गुमी शहराच्या नगर परिषदेत काम करणारा रोबोट कर्मचारी अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे. या रोबोटने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या गुमी शहराच्या नगर परिषदेत रोबोट कर्मचारी रुजू झाला होता. तो दररोज कागदपत्रांची वाहतूक करणे, शहराचा प्रचार करणे आणि स्थानिक रहिवाशांना माहिती देणे अशी कामे करत होता. अगदी कामावर येण्यासाठी त्याचा स्वत:चे एक वेळापत्रक होते. सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत तो काम करत असे. इतकेच नाही तर लिफ्ट बोलविण्यासारखी कामे तो स्वतंत्रपणे करू शकत होता.
परंतु काही दिवसांपूर्वी तो दुस-या मजल्यावर जाताना अचानक कोसळला आणि बंद पडला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कोसळण्याआधी तो काही वेळ एका जागी फिरत होता. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
काही नागरिकांचा तर असा दावा आहे की, रोबोटने कामाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. काहींनी तर रोबोटलाही विश्रांतीची गरज असते, सुट्टी हवी आणि युनियनची गरज असते असे म्हटले आहे.
दरम्यान, अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. रोबोटच्या मोड्यूलची तपासणी केली जाणार आहे. या घटनेनंतर सध्यातरी दुसरा रोबोट ठेवण्याचा विचार नगर परिषदेचा नाही.
दक्षिण कोरियामध्ये रोबोट्सचा विविध क्षेत्रात वापर वाढत आहे. मात्र, अशी घटना यापूर्वी घडली नव्हती. त्यामुळे ही घटना सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे.