khabarbat News Network
संभाजीनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच आता ‘वंचित’ने संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये ‘सगेसोयरे’संदर्भात लावलेल्या होर्डिंगने भर घातली आहे.
बुधवारी (दि. २७ जून) छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ‘वंचित’ने लावलेल्या या होर्डिंगच्या माध्यमातून सगेसोय-यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध केला आहे. आर.बी. फाऊंडेशनकडून लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छूक असा करण्यात आला आहे.
होर्डिंगवरील मजकूर असा…
शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची (वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे.
आरक्षण कायदा व नियमावलीमध्ये चुकीची ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाची आरक्षण निती आणि आरक्षणामागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करत आहेत. त्यामुळेच समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समुहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजाला सगेसोय-यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ताकदीने लढणार : मनोज जरांगे
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने ‘सगेसोयरे’चा अध्यादेश रद्द करावा तथा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या आशयाचे होर्डिंग लावले आहे. याबाबत मनोज जरांगे यांना वंचित बहुजन आघाडीने अशी का भूमिका घेतली? हे विचारले. त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला याबाबत माहिती नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर यांचा आपल्याला स्पष्टपणा आवडतो. त्यामुळे आपण अगोदरही सन्मान करत होतो आणि उद्याही करत राहू असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले.