राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून आजारपणाच्या कारणावरून जामिनावर सुटका झाली आणि ते नागपूर ला हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाले. मात्र ते विधानसभा सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसल्याने एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे याबाबत विधानसभा सभागृहात कुणी माहिती विचारली नाही.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोची झाली. नवाब मलिक यांनी कुर्ल्याच्या प्रकरणात थेट दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्यासोबत जमिनीचा व्यवहार केला, असा आरोप आहे. दाऊद च्या बहिणीशी व्यवहार म्हणजे थेट देशद्रोह होतो, असे भाजपचे म्हणणे आहे. याच आरोपावरून नवाब मलिक हे तुरुंगात होते. तुरुंगातून ते कुणाच्या मेहरबानी ने वैद्यकीय जामिनावर सुटले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच ते बिनधास्त विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसले.
खरे म्हणजे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप हे नवाब मलिक यांच्यापेक्षा गंभीर आहेत. त्यांचे आणि इक्बाल मिर्ची या दाऊदच्या साथीदाराचे थेट संबंध आहेत. त्याची सी.जे.हाऊस ही वरळीमधील इमारत ईडीने ताब्यात घेतली. पण नवाब मलिक यांना टार्गेट करण्याचा दिखाऊपणा का करण्यात आला? याची अनेक कारणे आहेत. खरे म्हणजे नवाब मलिक यांच्या जमिनीचे प्रकरण हे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केले. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि ते अटकेत गेले. मात्र त्यानंतर नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन कसा मिळवला, हे सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील.
विधानभवनात हे प्रकरण विधानसभेत उपस्थित न होता विधानपरिषदेत का आले? याचा खुलासा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करु शकतील. अजितदादा पवार यांनी भाजपसोबत घरोबा करताना आमदारांची यादी दिली होती. ही यादी देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवली होती. त्यामधे नवाब मलिक यांचे नाव नव्हते का? हा सुद्धा प्रश्न अनुत्तरीत आहे.
या यादीत अनिल देशमुख ही होते पण त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिल्यानंतर ते माघारी आले. दुसरा मुद्दा असा की राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर तर थेट इक्बाल मिर्ची यांच्यासोबत भागीदारी असल्याचे आरोप आहेत. तरी ते आता भाजप आणि अजितदादा यांच्यातील समन्वयक आहेत. ईडीच्या अटकेपासून त्यांना कुणी वाचवले हे सर्वश्रुत आहे. पण मुद्दा असा आहे की एखाद्या हिंदू नेत्याचे दाऊदच्या माणसाशी संबंध असले तर तो देशद्रोही नसतो. पण नवाब मलिक केवळ मुस्लिम आहेत या कारणासाठी देशद्रोही ठरतात.
नवाब मलिक यांच्यासमोर धर्मसंकट आहे. त्यांना ईडीच्या कोठडी पासून संरक्षण हवे आहे. त्यामुळे दृश्य स्वरूपात नव्हे तर अदृश्य स्वरूपात अजितदादा पवार यांच्यासोबत राहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांचे ते पत्र म्हणजे एक नाटक होते. त्यांनी मारल्यासारखे करायचे आणि अजितदादांनी रडल्यासारखे करायचे. फडणविस यांनी पत्र लिहिले आणि अजितदादांनी पत्राची नोंद घेतल्याचे सांगितले. त्यानंतर या विषयाला पूर्णविराम देण्यात आला.