धर्मस्थळ : khabarbat News Network
कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ धर्मस्थळ येथे गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या खून, बलात्कार आणि बेकायदेशीर दफनाच्या कथित प्रकरणांची चौकशी करणा-या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. धर्मस्थळ हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले असून श्री मंजुनाथेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते.


दरम्यान, कर्नाटक हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना निर्देश दिले की धर्मस्थळातील कथित दफनांबाबत स्वतंत्र माहिती असल्यास ती नोंदवावी. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी सुनावणी २६ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
सध्या एसआयटी धर्मस्थळ येथे शेकडो लोकांच्या हत्या व बेकायदेशीर दफन प्रकरणाची चौकशी करत आहे. धर्मस्थळ सामूहिक दफन प्रकरण जुलै २०२५ मध्ये प्रकाशात आले, जेव्हा एका माजी सफाई कामगाराने दावा केला की १९९५ ते २०१४ या काळात त्याला मंदिर शहराजवळ १०० हून अधिक मृतदेह दफन करण्यास भाग पाडले गेले होते. तक्रारदाराचे नाव सी.एन. चिन्नय्या असे असून त्याने आरोप केला की हे मृतदेह मुख्यत्वे महिलांचे व अल्पवयीनांचे होते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचारांचे चिन्ह होते. चिन्नय्याने न्यायालयात काही सांगाड्यांचे अवशेषही सादर केले होते.