नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपातीचे धोरण लागू केले. त्यामुळे दैनंदिन वापरातील अन्न पदार्थांसह कपडे, विमा बहुतेक बाबी स्वस्त झाल्या. लवकरच गृहकर्जावरील ईएमआय सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.

आरबीआय रेपो दरात कपात करून ग्राहकांना स्वस्त कर्जाची भेट देऊ शकते. तर अनेकांचा ईएमआय अजून कमी होऊ शकतो. आरबीआय येत्या महिन्यात रेपो दरात ५० बेसिस पाईंटची कपात करू शकते. पतधोरण समितीची पुढील महिन्यात बैठक होत आहे. दिवाळीचा डबल धमाका करण्यासाठी आता आरबीआयने कंबर कसल्याचे बोलले जात आहे.
किरकोळ महागाई दर येत्या काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे रेपो दर ५० आधार अंकांपर्यंत घसरेल, असा अंदाज प्रसिद्ध संस्था मॉर्गन स्टेनलीने व्यक्त केला आहे. अन्नधान्याच्या किंमती घसरल्या आहेत. जीएसटी कपातीचा फायदा मिळत आहे. वस्तूंच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाईचा तोरा कमी होण्याची शक्यता स्टेनलीच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये तर महागाई दर सरासरी २.४ टक्के राहील असा दावा स्टेनलीच्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आरबीआय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी २५ आधारावर एकूण ०.५० टक्के रेपो दर कपात करेल, असा या संस्थेचा अंदाज आहे.
या अहवालानुासर, गेल्या सात महिन्यांपासून किरकोळ महागाई दर आरबीआयच्या लक्षित ४ टक्क्यांच्या उद्दिष्टांपेक्षा कमी आहे. त्याचे एक कारण खाद्यपदार्थांच्या किंमतीत आलेली घसरण हे सुद्धा आहे. पण मूळ महागाई दर अद्याप ४.२ टक्क्यांच्या घरात आहे. तर गेल्या २२ महिन्यात मूळ महागाई दर हा ३.१ टक्क्यांवर आणि ४ टक्क्यांपेक्षा कमी होता.