नवी दिल्ली : प्रतिनिधी
GST कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. या बदलांमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून तंबाखू आणि इतर काही चैनीच्या वस्तूंवरील जीएसटी वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.

सप्टेंबर महिन्यात या बदलांना अंतिम स्वरुप देण्यासाठी दोन दिवसांची बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २०१७ पासून देशात वस्तू व सेवा कर प्रणाली सुरू झाली. देशात सध्या सोने, चांदी आणि इंधन वगळता बहुतेक वस्तू आणि सेवांवर ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के अशा कर श्रेणीनुसार जीएसटी आकारला जातो. सिगारेट आणि महागड्या गाड्यांवर अतिरिक्त कर लावला जातो. प्रस्तावित सुधारणांचा उद्देश १२ टक्क्यांची श्रेणी काढून टाकणे आणि त्या वस्तूंचे ५ आणि १८ टक्क्यांच्या श्रेणींमध्ये पुनर्वितरण करणे आहे.
हे पण वाचा…. कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार?
घरगुती बजेट ठीक राहिल
सरकार सर्वसामान्यांना रोजच्या महागाईपासून दिलासा देऊ शकते. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाऊ शकतो. पण, कोणकोणत्या वस्तूंवर जीएसटी दर कमी होईल, हे सांगता येत नसले तरी सणाच्या काळात लोकांचे घरगुती बजेट सुस्थापित होईल, असे दिसते.
खालील वस्तू स्वस्त होऊ शकतात…
सध्या १२% जीएसटी स्लॅबमध्ये नमकीन, भुजिया आणि इतर स्रॅक्स, ज्यूस, बदाम, अक्रोड, काजू, लोणी, तूप आणि चीज तसंच ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे शूज, चप्पल आणि सँडल, १००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या साड्या, सूट आणि कुर्ता या सारखे कपडे, मोबाईल फोन, चार्जर, कम्प्युटर आणि लॅपटॉप, पॅकेज्ड आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक औषधं, कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्मा, केसांचं तेल, साबण, टूथपेस्ट आणि शेतीमध्ये वापरल्या जाणा-या उत्पादनांचा समावेश आहे. जर यावरील जीएसटी १२ वरून ५% पर्यंत कमी केला तर त्यांच्या किमती कमी होतील.
१८% जीएसटी दर हा मध्यम-उच्च स्लॅब आहे, जो अनेक दैनंदिन वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध सेवांवर लागू होतो. या स्लॅबमध्ये अशी उत्पादनं आणि सेवांचा समावेश आहे ज्या अत्यंत आवश्यक नाहीत किंवा संपूर्ण लक्झरीच्या श्रेणीत येत नाहीत. बिस्किटे, केक, पेस्ट्री आणि इतर बेकरी उत्पादनं (पॅकेज्ड आणि ब्रँडेड), ब्रँडेड कॉर्नफ्लेक्स, पास्ता, मॅकरोनी, नूडल्स, ३२ इंचांपर्यंतचे एलसीडी/एलईडी टीव्ही, कॅमेरा, स्पीकर, हेडफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, हीटर, कॉफी मेकर, सौंदर्यप्रसाधनं, शॅम्पू, केसांचे रंग, १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीची पादत्राणं, अॅल्युमिनियमचे दरवाजे, खिडक्या, तारा आणि केबल्स आणि काचेच्या उत्पादनांसारख्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर १८% जीएसटी लागू आहे. दिवाळीपर्यंत ही उत्पादने स्वस्त होण्याची शक्यता आहे कारण सरकार त्यांच्यावरचा जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे.