वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ चंद्रावर अणुभट्टी उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट २०३० पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती उभारण्याचे आहे. ही योजना भविष्यात चंद्रावरील मानवी वस्त्या आणि वैज्ञानिक संशोधनासाठी अमर्याद ऊर्जेचा स्रोत प्रदान करेल. ‘नासा’चे कार्यकारी प्रमुख सीन डफी यांनी या योजनेची घोषणा केली.


ही योजना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारच्या अवकाश स्पर्धा तीव्र करण्याच्या धोरणाचा एक भाग मानली जात आहे. New York Post च्या वृत्तानुसार, NASA या प्रकल्पासाठी लवकरच खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवणार आहे. ‘नासा’चे लक्ष्य १०० किलोवॅट क्षमतेची एक अणुभट्टी विकसित करणे आहे. ही अणुभट्टी चंद्रावरील भविष्यातील अर्थव्यवस्थेला गती देईल आणि अमेरिकेच्या अवकाश सुरक्षेला मजबूत करण्यास मदत

करेल. यामागे एक प्रमुख चिंता अशी आहे की, जर रशिया किंवा चीनसारख्या इतर अवकाश महासत्तांनी चंद्रावर आधी अणुभट्टी उभारली, तर ते चंद्रावर आपला हक्क सांगू शकतात, ज्यामुळे अमेरिकेसमोरील आव्हाने वाढतील. याच कारणामुळे या प्रकल्पाला अत्यंत प्राधान्य दिले जात आहे.
NASA ने २०२२ मध्येच तीन खासगी कंपन्यांना प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख डॉलर (सुमारे ४० कोटी रुपये) दिले होते. हा प्रकल्प आर्टेमिस मिशनचा एक भाग असून, त्याचा अंदाजित खर्च ८,२०० अब्ज रुपये आहे.