नवी दिल्ली :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘Dead Economy’ असे वर्णन केले होते. मात्र आता त्यांच्याच ‘The Trump Organization’ या कंपनीने त्यांच्या या दाव्याची पोलखोल केली. अमेरिकेबाहेर या कंपनीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ भारत ठरला आहे. गेल्या दशकात ट्रम्प यांच्या कंपनीने भारतात किमान १७५ कोटी रुपये कमावले आहेत. हे उत्पन्न मुंबई, पुणे, कोलकाता आणि गुरुग्राममध्ये विस्तारलेल्या सात Real Estate प्रकल्पांमधून मिळाले असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कंपनीने भारतात विस्तार सुरू केला. मागील आठ महिन्यांत, ‘The Trump Organization’ने त्यांच्या भारतीय भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्ससोबत ६ नवीन प्रकल्पांची घोषणा केली. हे प्रकल्प गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बंगळुरू येथे आहेत. या प्रकल्पांतर्गत एकूण ८० लाख चौरस फूट रिअल इस्टेट क्षेत्र विकसित केले जाईल. यापैकी गुरुग्राम, पुणे आणि हैदराबाद येथे सुमारे ४३ लाख चौरस फुटाचे तीन प्रकल्प या वर्षी सुरू झाले आहेत.

ट्रम्प यांच्या कंपनीने २०१२ मध्येच भारतात प्रकल्प सुरू केले आहेत. २०२४ पर्यंत ‘Trump Organization’चे भारतातील एकूण विकसित रिअल इस्टेट क्षेत्र ३० लाख चौरस फूट होते. ६ नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, कंपनीचा विस्तार जवळजवळ चार पटीने वाढून १.१० कोटी चौरस फूट होईल. ट्रम्प यांची उपकंपनी असलेल्या ट्रिबेकाने नवीन प्रकल्पांमधून १५ हजार कोटी रुपयांच्या विक्रीची आशा व्यक्त केली आहे.
‘Trump Organization’ बांधकामात थेट गुंतवणूक करत नाही. ही कंपनी त्यांच्या ब्रँड नेमला परवाना देते. त्या बदल्यात, कंपनीला आगाऊ शुल्क, डेव्हलपमेंट कर किंवा विक्रीच्या ३ ते ५ टक्के रक्कम मिळते. ट्रम्प ब्रँडच्या मालमत्ता लक्झरी विभागात विकल्या जातात, यामुळे त्यांना प्रीमियम दर मिळतात.
ट्रम्प प्रकल्पांच्या विकासकात रिलायन्स, लोढा, युनिमार्क ग्रुप
भारतात अनेक मोठ्या कंपन्या ट्रम्प यांचे प्रकल्प विकसित करत आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, लोढा ग्रुप, एम३एम ग्रुप, पंचशील रिअॅल्टी, युनिमार्क ग्रुप, आयआरए इन्फ्रा सारख्या स्थापित रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश आहे. कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वाखालील (Tribeca Developers) ट्रिबेका डेव्हलपर्स ही भारतातील ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ची अधिकृत भागीदार आहे.