नवी दिल्ली : News Network
Anil Ambani appear before ED | रिलायन्स एडीएजी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीच्या कथित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अनिल अंबानी यांना गेल्या आठवड्यात समन्स बजावण्यात आले होते. ज्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली त्यात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) यांचा समावेश आहे.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) सुरू करण्यात आलेली ही ईडी चौकशी सुमारे २० खाजगी आणि सरकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जांशी संबंधित आहे. ही आता नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्समध्ये (एनपीए) बदलली आहेत. ईडीच्या तपासानुसार, आरएचएफएलवर ५,९०१ कोटी रुपये, आरसीएफएलवर ८,२२६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि आरकॉमवर सुमारे ४,१०५ कोटी रुपये थकीत आहेत.
अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाच्या या कंपन्यांनी बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतले, परंतु त्या पैशांचा योग्य वापर केला नाही, असा आरोप आहे. म्हणजेच ज्या उद्देशाने कर्ज घेतले होते तो उद्देश पूर्ण झाला नाही, उलट शेल कंपन्यांद्वारे पैसे वळवण्यात आल्याचे आरोप आहेत. याशिवाय, ईडीच्या तपासात अनेक बनावट कागदपत्रे आणि बँक हमींचा वापरही उघड झाल्याचे सांगण्यात येते.