छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
देशभरात चर्चेत असलेल्या Digital arrest या सायबर क्राइमच्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये संभाजीनगर शहरातील दोन मुले सहभागी असल्याची धक्कादायक बाब तामिळनाडू पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. श्रीकांत सुरेशराव गाडेकर (रा. वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर), नरेश कल्याणराव शिंदे (रा. आर्यन सिटी, तिसगाव चौफुली, वाळूज) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही अभियंते असून गेल्या अनेक दिवसांपासून ते दिवसभर देवळाई परिसरात हॉटेलमध्ये रूम बुक करून ऑनलाइन फसवणुकीचे टार्गेट पूर्ण करत होते.

तामिळनाडूतील चेन्नईच्या, तिरूवनचेरीत राहणा-या प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी यांना दिल्ली सायबर पोलिस असल्याचे भासवून कॉल करण्यात आला होता. बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंगद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये अडकवले. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी २७ लाख २४ हजार ९०० उकळण्यात आले होते. या प्रकरणी तामिळनाडूचे तिरूवनचेरी (तांबरम शहर) पोलिस तपास करत होते. तांत्रिक तपास करत असताना तामिळनाडू पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले. पोलिस निरीक्षक व्ही. के. सशिकुमार हे २९ जुलै रोजी पथकासह शहरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन त्यांनी सहकार्याची विनंती केली. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या सूचनेवरून विशेष पथक तयार केले.
तामिळनाडू पोलिसांकडे केवळ तांत्रिक पुरावे होते. त्यामुळे आरोपींचा माग काढणे आव्हानात्मक होते. तपासात आरोपी देवळाई चौकातील एका हॉटेलमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तत्काळ पथकाने हॉटेल गाठत श्रीकांत व नरेशला ताब्यात घेतले. तामिळनाडू सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सातारा पोलिस ठाण्यात नोंद करुन रवाना झाले. मात्र, Digital arrest चे धागेदोरे शहरातील वडगाव कोल्हाटीच्या तरुणांपर्यंत पोहोचल्याचे कळल्यानंतर पोलिस विभाग थक्क झाला आहे.