नेपीडॉ : News Network
म्यानमारमध्ये ४ वर्षांपूर्वी आंग सॅन सू की यांना अटक झाली होती, हे चित्र अवघ्या जगाच्या डोळ्यासमोर अजूनही आहे. आता (Myanmar) म्यानमारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथील लष्कराने तब्बल ४ वर्षानंतर आणीबाणी उठवली असून तुरुंगात असलेल्या आंग सॅन सू की यांचे भवितव्य बदलणार का? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

जुंटा सरकारने सहा महिन्यांत निवडणुका घेण्यासाठी आयोगाची स्थापना केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये तत्कालीन कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष यू मिंट स्वी यांनी लष्करप्रमुखांकडे सत्ता सोपवत एक वर्षाची आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर राज्य प्रशासन परिषदेची स्थापना करण्यात आली आणि आणीबाणीला वारंवार सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. ३१ जुलै २०२५ नंतर आणीबाणी न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सू की यांचे काय होणार?
फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारच्या लष्कराने आंग सॅन सू की यांचे निवडून आलेले सरकार उलथवून टाकले होते. यानंतर आंग सॅन स्यू की आणि त्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षाच्या बहुतांश प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ३० वर्षांहून अधिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या प्रकारे लष्कराने आपल्या देखरेखीखाली निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि कडक कायदे केले आहेत, त्यामुळे सू की यांच्याकडून फारशी आशा नसल्याचे जाणकारांचे मत आहे.