मुंबई : News Network
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्स ६५० अंकांनी आणि निफ्टी २०० हून अधिक अंकांनी घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ५.२७ लाख कोटींचे मार्केट कॅप एका दिवसात कमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे हा सर्वात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

– सेन्सेक्स : ५८६ अंकांनी घसरून ८०,५९९ वर बंद झाला.
– निफ्टी : २०३ अंकांनी घसरून २४,५६५ वर बंद झाला.
– सुमारे २,३५० शेअर्समध्ये घसरण झाली, तर फक्त १,१६८ शेअर्समध्ये वाढ झाली.
दोन वर्षांतील सर्वात मोठा झटका : शेअर बाजार सलग पाचव्या आठवड्यात घसरला आहे, जी गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी घसरण ठरली. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुमारे १% नी घसरले. मिडकॅप आणि बँकिंग क्षेत्राला या घसरणीचा आणखी मोठा फटका बसला.
घसरणीची प्रमुख ५ कारणे :
१) ट्रम्पचा टॅरिफ शॉक : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ, अॅडजस्टेड हा नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार, भारतातून निर्यात होणा-या अनेक वस्तूंवर २५% टॅरिफ (आयात शुल्क) लावला जाईल. यामुळे भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
२) परदेशी गुंतवणूकदारांची विक्री : परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल ५,५८८ कोटींचे शेअर्स विकले. त्यांची ही सततची विक्री बाजारावर दबाव टाकत आहे.
३) जागतिक बाजारात मंदी : चीन, जपान आणि कोरियासारख्या आशियाई बाजारांमध्येही घसरण दिसून आली. अमेरिकेतही बाजार घसरल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना वाढली.
४) अस्थिरता निर्देशांक वाढला : बाजारातील अस्थिरता दर्शवणारा इंडिया व्हिक्स (व्होलॅटिलिटी इंडेक्स) २% नी वाढून ११.७७ वर पोहोचला. हा निर्देशांक वाढला की, बाजारात भीती आणि अनिश्चितता वाढत असल्याचे मानले जाते.
५) औषध क्षेत्राला दुहेरी धक्का : निफ्टी फार्मा निर्देशांक ३% नी घसरला. ट्रम्प यांनी जगातील १७ मोठ्या औषध कंपन्यांना अमेरिकेतील औषधांच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. यामुळे सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन यांसारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
गुंतवणूकदारांसाठी संधी की धोका?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी जर २४,६०० च्या खाली गेला तर तो २४,४५० पर्यंत घसरू शकतो. पण ही घसरण घाबरण्याचे कारण नाही. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर ही एक गुंतवणुकीची संधी असू शकते.