नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून थांबले नाही. भारताचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी आज याबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे. ते म्हणाले की ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते.

अनिल चौहान म्हणाले, आजचे युद्ध पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचे मिश्रण आहे. यामध्ये गतिज (शस्त्रांवर आधारित) आणि गैर-गतिज (माहितींवर आधारित) दोन्ही रणनीतींचा समावेश आहे. हे पहिल्या, दुस-या आणि तिस-या पिढीच्या युद्ध तंत्रांचे समन्वय आहे. युद्धासाठी शास्त्र आणि शस्त्र (ज्ञान) दोन्ही आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही. सैन्याने सर्व परिस्थितीत २४ तास, ३६५ दिवस तयार असले पाहिजे.