नवी दिल्ली : प्रतिनिधी
Intruders in Bihar | बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले. बिहारमध्ये ५६ लाख अवैध मतदार कसे आले, असा सवाल विचारत त्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

महुआ मोईत्रा म्हणाल्या की, सीमेसंबंधीचे विषय हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कक्षेत येतात. त्यामुळे ५६ लाख अवैध घुसखोर आले असतील तर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. दरम्यान, बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे.