दौलताबाद (संभाजीनगर) : प्रतिनिधी
boyfriend brutally murdered girlfriend | पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निर्घृण खून केला. मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. गुरुवारी (२४ जुलै) रात्री ही थरकाप उडवणारी घटना घडली असून, शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

दिपाली गणेश आस्वार (वय १९, रा. माळीवाडा, ता. कन्नड) असे मृत युवतीचे नाव असून, ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती. मांडकी (ता. वैजापूर) येथील सुनील सुरेश खंडागळे (वय २१) याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रेमसंबंध होते. गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठले आणि दिपालीला भेटले. दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले. तेथे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाचे मूळ कारण म्हणजे दिपालीने एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास “बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी दिली. या प्रकाराने संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला. रागाच्या भरात त्याने दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला. नंतर मृतदेह घाटात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला.