ब्लागोवेश्चेन्स्क : News Network
रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान चीनला लागून असलेल्या रशियातीलच अमूर प्रांतात जळत असलेल्या अवस्थेत आढळून आले. कॅबिन क्रू आणि पाच लहान मुलांसह ४३ प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. सगळ्यांचा मृत्यू झाल्याचे रशियातील वृत्तसंस्था ‘तास’ने म्हटले आहे.


सैबेरियातील अंगारा एअरलाईन्स या कंपनीचे हे विमान होते. एएन२४ हे प्रवासी विमान चीन सीमेलगत असलेल्या अमूर प्रांतातील टिंडा शहराकडे जात होते. पूर्व अमूर प्रांतामध्ये हे विमान अपघातग्रस्त झाले. रशियातील अमूर प्रांतातीलच ब्लागोवेश्चेन्स्क शहरातून हे विमान टिंडा शहराकडे निघाले होते. रशियाच्या आपतकालीन मंत्रालयाने म्हटले आहे की, रशियाच्या नागरी उड्डाण विभागाला हे विमान जळत असलेल्या अवस्थेत आढळले. टिंडा शहरापासून १६ किमी अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात हे विमान कोसळले.
हे पण वाचा…. Alimony | कमावत्या पत्नीलाही पोटगी मिळण्याचा अधिकार
डोंगराळ भागात पडल्यानंतर विमानाने पेट घेतला. या विमानाला लागलेल्या आगीत सर्व ४३ प्रवाशांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाला, असे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे.
विमान ५० वर्षांपूर्वीचे
अंगारा एअरलाईन्सचे अपघातग्रस्त झालेले विमान ५० वर्षांपूर्वीचे आहे. विमानाच्या शेपटीवर त्याची बांधणी १९७६ मध्ये करण्यात आलेली असल्याचा उल्लेख आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले होते. डोंगराळ भागातून धूर येत असल्याचे दिसून आले. हेलिकॉप्टर अपघातस्थळी पोहोचले त्यावेळी विमानाचा मुख्य भाग जळत होता. ही माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले.