नवी दिल्ली : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता पाय घ्यावा लागला.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, संसद भवनाच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना आम्ही रोखले, तिथे तुम्ही महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह विधान का केले, याचा जाब विचारला. तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार आहात हे विचारले. काँग्रेस महिला खासदारांचा आक्रमक पवित्रा पाहून निशिकांत दुबे यांनी तिथून नाही, नाही जय महाराष्ट्र असे म्हणत काढता पाय घेतला असे त्यांनी सांगितले.
‘जय महाराष्ट्र’ची घोषणा ऐकून इतर खासदारही तिथे जमले. ही सर्व घटना संसद लॉबीतील कॅन्टीनजवळ घडली. दरम्यान, महाराष्ट्राची बदनामी होतेय, त्यामुळे आमच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना जाब विचारला. तुम्ही काय केले. दुबेला अडवले. तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तर पक्षभेद विसरून मराठी म्हणून आपण एकत्र येतोय, महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले.