नागपूर : प्रतिनिधी
प्लास्टिक प्रदूषणाचा मानवी मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. विशेषत:, मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण ठरले आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या मते, डिमेंशिया असलेल्या लोकांच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सची पातळी सामान्यांपेक्षा १० पट अधिक असते. दरवर्षी जवळपास आपण सारेच २५० ग्रॅम प्लास्टिक खात असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

डॉ. निहार्ट आणि त्यांच्या सहका-यांनी ‘नेचर मेडिसिन जर्नल’मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, १ नॅनोमीटर ते ५ मिमी आकाराच्या प्लास्टिक कणांना मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात, तर १ नॅनोमीटरपेक्षा लहान कणांना नॅनोप्लास्टिक्स म्हणतात. हे प्लास्टिकचे कण पोटातून, श्वासाद्वारे किंवा त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि रक्ताभिसरणात मिसळून यकृत, मूत्रपिंड आणि विशेषत: मेंदूत जमा होतात. मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण यकृत आणि मूत्रपिंडापेक्षा २०-३० पट जास्त असल्याचे आढळले.
ट्युनिशियातील वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे माजी विश्वस्त डॉ. रियाद गुदेर यांनी सांगितले की, २०१६ मध्ये मृत पावलेल्या सामान्य लोकांच्या मेंदूची २०२४ मध्ये मृत पावलेल्या लोकांशी तुलना केली असता, २०२४ च्या मेंदूमध्ये सुमारे ५० टक्के जास्त मायक्रोप्लास्टिक्स आढळले. मेंदूतून आढळलेल्या १२ प्रकारच्या प्लास्टिक पॉलिमरपैकी, बाटल्या आणि कपसारख्या पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे पॉलीइथिलीन सर्वाधिक प्रमाणात दिसते.
लिपस्टिकमध्ये मायक्रोप्लास्टिक
त्वचा हा प्लास्टिकच्या प्रवेशाचा आणखी एक स्रोत आहे. सौंदर्यप्रसाधने, लिपस्टिकमध्ये भरपूर मायक्रोप्लास्टिक्स असतात. आपण घालतो त्या सिंथेटिक पॉलिस्टर किंवा नायलॉन कपड्यांपासून बनवलेले मायक्रोप्लास्टिक्स त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात.
चहाच्या प्रत्येक घोटात हजारो मायक्रोप्लास्टिक
चहाचे कप असो की, चहाच्या पिशव्या या प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. जेव्हा त्यात गरम चहा ओतला जातो किंवा पिशव्या गरम पाण्यात ठेवल्या जातात तेव्हा प्लास्टिक वितळते आणि चहाच्या प्रत्येक घोटात हजारो मायक्रोप्लास्टिक्स आपण ग्रहण करतो.
वनस्पतींच्या मुळांद्वारे मायक्रोप्लास्टिकचे शोषण
आपल्या आहारात फळे आणि भाज्या असल्या तरी, त्या मायक्रोप्लास्टिक्सपासून सुरक्षित नाहीत. मुळांद्वारे मायक्रोप्लास्टिक्स शोषून घेऊन ते बिया, पाने आणि फळांमध्ये प्रवेश करतात. सफरचंद आणि गाजरात प्रति ग्रॅम एक लाखांपेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक्स आढळतात.
२ लाखांवर प्लास्टिक कण एक लिटरच्या पाणी बाटलीतून पोटात
प्लास्टिकच्या बाटलीतून एक लिटर पाणी पितो तेव्हा २ लाख ४० हजार प्लास्टिक कण आपल्या पोटात जातात. प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम केल्याने त्या अन्नात अब्जावधी प्लास्टिकचे कण सोडले जातात हे दिसून आले आहे. टूथपेस्टमध्येही मायक्रोप्लास्टिक्स असतात.