मुंबई : प्रतिनिधी
raj thackeray | मराठीच्या मुद्द्यावरुन मनसैनिकांनी मिरारोड येथे एका व्यापा-याला मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातील हिंदी भाषिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त केला. शुक्रवारी मिरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी इतर भाषिकांना मराठी शिका आणि महाराष्ट्रात शांतपणे राहा असा इशारा दिला. त्यानंतर आता थेट सर्वोच्च न्यायालयात (raj thackeray) राज ठाकरेंविरोधात भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.

हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणायचे, अमराठी मतदारसंघ बनवून हा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू आहे. तुम्ही प्रत्येकाशी मराठीतच बोला, असे आवाहन राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील सभेत केले. हिंदी सक्तीचा प्रयत्न तर करून बघा, दुकानेच नाही; शाळाही बंद करु असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. महाराष्ट्रात परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम ‘एनएसए’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली.