नवी दिल्ली : प्रतिनिधी
Diet alert | सध्याच्या काळात ब-याच जणांना लठ्ठपणाचा आजार बळावत आहे. त्यात जंक फूडबाबत सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. आता सिगारेट, तंबाखूसारखे समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार आहे. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि युवकांमध्ये आवश्यकतेपेक्षा वाढणारे वजन यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जंक फूडवर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, २०५० पर्यंत ४४.९ कोटी भारतीय अधिक वजन आणि लठ्ठपणाचे बळी ठरतील असा अंदाज आहे. यात अमेरिकेनंतर भारताचा नंबर येतो.
रिपोर्टनुसार, आरोग्य मंत्रालयाने ‘एआएमएमएस’सह अनेक केंद्रीय संस्थांना अशाप्रकारचे पोस्टर्स लावण्याचे आदेश दिले. ज्यात स्पष्टपणे दररोज करण्यात येणा-या नाश्त्यात किती फॅट आणि साखर आहे त्याचा उल्लेख करण्यात यावा. विशेषत: पहिल्यांदाच अशाप्रकारे जंक फूडवर तंबाखूसारखा इशारा देणारी सूचना जारी करण्याची तयारी करण्यात आली आहे.
लोकांना नाश्त्यातील पदार्थांमध्ये साखर, तेलाचे प्रमाण किती आहे याची माहिती देणे बंधनकारक आहे. या पदार्थांच्या यादीत लाडूपासून वडापाव, भजी यासह अनेक खाद्याचा समावेश आहे. लवकरच कॅफे आणि सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहेत. साखर आणि फॅट्स हे नवीन तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यामुळे आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे असं नागपूरचे कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमर अमाले यांनी म्हटलं.