नवी दिल्ली : प्रतिनिधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सी. सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे. ऐन तारुण्यात कम्युनिस्टांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन पाय गमाविल्यानंतरही त्यांनी राजकीय संघर्ष आणि समाजकार्य सुरू ठेवले होते. तथापि, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, माजी डिप्लोमॅट हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मिनाक्षी जैन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.

सदानंदन मास्टर यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाला होता. केरळमधील इतर कुटुंबांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबामध्ये डाव्या विचारांचा पगडा होता. मात्र सदानंदन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित होऊन वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी संघ स्वयंसेवक बनले होते.
२५ जानेवारी १९९४ रोजी सदानंदन यांच्यावर त्यांच्या कम्युनिस्टांनी (माकप) जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचे दोन्ही पाय राजकीय विरोधकांनी करवतीने भर रस्त्यावर कापले होते. त्यावेळी त्यांचे वय सुमारे ३० वर्षे एवढे होते. सदानंदन मास्टर यांनी २०२१ मध्ये केरळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. सदानंदन यांची पत्नीसुद्धा पेशाने शिक्षक असून, त्यांची मुलगीही उच्चशिक्षित आहे. आता सदानंदन मास्टर यांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत राष्ट्रपतींनी घटनेतील कलम ८० (३) नुसार राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.