वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘Tarrif bomb’ एकामागून एक अनेक देशांवर फुटत आहे. जपान आणि दक्षिण कोरियासह १४ देशांना पाठवलेल्या टॅरिफ पत्रांपासून त्याची सुरुवात झाली. तेव्हापासून अनेक देशांवर टॅरिफ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आतापर्यंत ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के कर लादला आहे, तर अलीकडेच त्यांनी मेक्सिको आणि युरोपियन युनियनवर ३० टक्के टॅरिफची घोषणा देखील केली. भारत-अमेरिका दरम्यान सुरू असलेल्या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, अद्याप भारतावर कर लादलेला नाही. परंतु तो किमान १५ ते कमाल २० टक्के दरम्यान असू शकतो.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या सर्वात अलीकडील टॅरिफ घोषणेत मेक्सिको-युरोपियन युनियनचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने या दोन्ही देशांवर ३० टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे. हा कर १ ऑगस्टपासून लागू होईल. विशेष म्हणजे, २७ सदस्यीय युरोपियन युनियन देखील अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या वाटाघाटी करत आहे, मात्र घोषणेपूर्वीच त्यांच्यावर टॅरिफ बॉम्ब पडला आहे.
युरोपियन युनियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी अमेरिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, युरोपियन युनियन निर्यातीवरील ३०% कर हा अटलांटिकच्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायांसाठी, ग्राहकांसाठी मोठा धक्का असेल.
भारतावरील कर माफक असू शकतो
ट्रम्प यांनी सर्व देशांची कर यादी शेअर केली असली तरी, भारताचे नाव अद्याप त्यात समाविष्ट केलेले नाही. यामागील कारण म्हणजे, अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही. कॅनडावर ३५ टक्के कर जाहीर करताना ट्रम्प यांनी भारतावरील कराबाबत दिलेल्या संकेतांनुसार, भारतावरील अमेरिकेचा कर २० टक्क्यांपेक्षा कमी असू शकतो. ट्रम्प म्हणाले होते की, प्रत्येक देशाला पत्रे पाठवणे आवश्यक नाही, जे व्यापार भागीदार आहेत त्यांच्यावर फक्त १५ ते २० टक्क्यांपर्यंत कर आकारला जाईल.