लाहोर : News Network
पाकिस्तानमधून नेहमी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. आता आणखी एक विचित्र बातमी समोर आली आहे. पाकिस्तान एअर लाइन्सचा निष्काळजीपणा समोर आला आहे. लाहोरहून कराचीला विमानाने प्रवास करणा-या एका व्यक्तीला पाक एअरलाइन्सच्या विमानाने सौदी अरेबियातील जेद्दाह येथे नेण्यात आल्याचे समोर आले.

या प्रवाशाचे नाव शाहजैन आहे, त्याने लाहोर विमानतळावरून कराचीचे तिकीट काढले होते, पण त्याला चुकीच्या विमानात बसवण्यात आले आणि शाहजैन व्हिसा आणि पासपोर्टशिवाय थेट परदेशात पोहोचला.
शहाजैनला फ्लाईटच्या मध्यभागी हे कळले. काही तासांनंतरही कराची न पोहोचता त्याने केबिन क्रू मेंबरला एक प्रश्न विचारला, त्यानंतर संपूर्ण फ्लाईटमध्ये गोंधळ उडाला. शहाजैनने स्थानिक माध्यमांना सांगितले की, लाहोर विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलच्या गेटवर २ विमाने उभी होती. मी एअरलाइन कर्मचा-यांना माझे तिकीटही दाखवले. मला कल्पनाही नव्हती की मी चुकीच्या फ्लाइटमध्ये चढत आहे. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर मी एअर होस्टेसला माझे तिकीटही दाखवले. ज्यावेळी विमान २ तासांच्या उड्डाणानंतरही कराचीला पोहोचले नाही, तेव्हा त्याने केबिन क्रूला विचारले की, विमान अद्याप कराचीत का उतरले नाही? यानंतर विमानात गोंधळ झाला. क्रू मेंबर्स या चुकीसाठी शाहजहानला दोष देऊ लागले.