बीजिंग : News Network
चीनने नुकतेच एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याने जगातील मोठ्या देशांची झोप उडवली आहे. ड्रॅगनने आता अशा मधमाश्या तयार केल्या आहेत, ज्या त्याच्या इशा-यावर काम करतील आणि शत्रूंची गुप्त माहिती सैन्यापर्यंत पोहोचवतील. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक झाओ जेलियांग आणि त्यांच्या टीमने जगातील पहिले ‘कीटक मेंदू नियंत्रक’ तयार केले आहे.


हे एक अत्यंत लहान यंत्र असून ते मधमाशीच्या पाठीवर बसवले जाईल. याचे वजन केवळ ७४ मिलिग्रॅम आहे, जे मधमाशीच्या मध गोळा करण्याच्या पिशवीपेक्षाही कमी आहे.‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, हे डिव्हाईस तीन अत्यंत पातळ सुयांच्या मदतीने मधमाशीच्या मेंदूशी जोडले जाईल आणि इलेक्ट्रॉनिक संकेतांद्वारे तिला दिशा निर्देश दिले जातील. हे संशोधन ‘चायनीज जर्नल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग’मध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधन अहवालानुसार, या डिव्हाईसची चाचणी केली असता १० पैकी ९ वेळा मधमाशीने दिलेल्या निर्देशांनुसार अचूक दिशेने उड्डाण केले.
भविष्यात अशा मधमाश्या लष्करासाठी गुप्तहेराचे काम करू शकतात किंवा भूकंपासारख्या आपत्तीनंतर ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठीही त्या प्रभावी मदत करू शकतात, असे सांगितले जात आहे. यापूर्वी सिंगापूरमध्येही अशाच प्रकारचे डिव्हाईस तयार करण्यात आले होते; परंतु ते चीनच्या डिव्हाईसपेक्षा तिप्पट जड होते. त्यामुळे ते केवळ किडे आणि झुरळांसारख्या हळू गतीच्या कीटकांवरच काम करू शकत होते. याउलट, चीनने बनवलेले डिव्हाईस अधिक कार्यक्षम आहे.
कारण, ते वेगाने उडणा-या आणि लांबचा पल्ला गाठू शकणा-या मधमाश्यांवर वापरले जाऊ शकते; मात्र या तंत्रज्ञानासमोर काही आव्हानेही आहेत. सध्या या डिव्हाईसला बाहेरून वीजपुरवठा करावा लागतो. यात बॅटरी बसवली, तर त्याचे वजन वाढेल आणि मधमाशीला ते घेऊन उडणे कठीण होईल. प्राध्यापक झाओ यांच्या टीमचे म्हणणे आहे की, भविष्यात हे तंत्रज्ञान अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने काम सुरू आहे. यासाठी सिग्नल आणि नियंत्रण तंत्रज्ञानात आणखी सुधारणा केल्या जातील.