भागवत धर्मात किंबहुना संप्रदायात एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन (कथित) व्रत पालन करणे प्रकृतीच्या अनारोग्याचे कारण ठरू शकते.

एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे भागवत संप्रदाय सुचवतो. ज्यांना प्रकृतीच्या कारणास्तव हे शक्य नाही त्यांनी मित आहार घ्यावा, असेही या संप्रदायाने स्पष्ट सांगितले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात.
उपवास म्हणजे काय? नेमका कसा करावा??
मन आणि शरीर यांनी कोणत्याही प्रकारे पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण (वर्तन) करू नये तसेच गुणीजनांचा सहवास, अध्यात्मिक सत्संग मिळवावा या दोन्ही क्रियांना मिळून उप+वास म्हणजे उपवास! अशा अर्थाने उपवासाला भागवत धर्मशास्त्रात मान्यता आहे. फक्त शरीराचे पोषण अर्थात (उपास) लंघन करेल तो उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपासाचे अनेकविध पदार्थ खाऊन उपास करत असू, तर त्याला उपवास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीरालाच नव्हे, तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असे भागवत संप्रदायात अपेक्षित आहे.
उपावृत्तस्य पापेभ्यो सहवासो गुणे हि य:।
उपवास: स विज्ञेय: न शरीरस्य शोषणम् ।।

अर्थात, उपवासामुळे शारीरिक लंघन घडते, परिणामी शरीरातील विकार दूर होण्यास तसेच मनाचे लंघन झाल्याने मनाचे विकार दूर होण्यास मदत होते. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन कामात, आणि अनन्यभावे भगवंताच्या नामस्मरणात रमवावे. मुळात आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासाचा खरा हेतू साध्य करायचा असेल तर तना-मनाचा उपवास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे!
।। जय हरी विठ्ठल ।।
– श्रीपाद सबनीस (shree astrology) संपर्क : 9960542605