बीड : प्रतिनिधी
Parali power project shut down | परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती पूर्णत: ठप्प आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण ७५० मेगावॅट क्षमतेपैकी सध्या शून्य वीज निर्मिती होत असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, संपूर्ण मराठवाड्यातील हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे, जे येथे धडधडत होते. परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव व दाऊतपूर शिवारातील नवीन औष्णिक केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यातील संच क्रमांक सहा व सात हे दोन संच मागील १५ दिवसांपासून बंद आहेत, तर संच क्रमांक आठ तब्बल महिनाभरापासून बंद आहे. यामुळे परळीतील औष्णिक विद्युत केंद्राची वीज निर्मिती सध्या संपूर्ण थांबली आहे.
Interesting News…. Mouse Juggler च्या मदतीने एकाच वेळी ५ ठिकाणी नोकरी!
विद्युत संच बंद ठेवण्यात आल्याने, कोळशाचा पुरवठादेखील कमी प्रमाणात होत असल्याने ही स्थिती अधिक बिकट झाली आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशानंतरच बंद ठेवलेले संच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.
८०० अधिकारी, कर्मचारी : राज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर हे संच कार्यरत होतील. दरम्यान, या नवीन औष्णिक केंद्रात सुमारे ८०० अधिकारी व कर्मचा-यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. मात्र, तीनही संच बंद असल्याने कर्मचा-यांमध्ये हे संच कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे.