टेक्सास (अमेरिका) : News Network
Driverless Car | अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाने इतिहास रचला आहे. कंपनीने आपल्या ‘मॉडेल वाय’ या कारद्वारे पहिली पूर्णपणे स्वयंचलित (fully autonomous) कारची डिलिव्हरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या प्रवासात कारमध्ये ना चालक होता, ना कुठलाही रिमोट कंट्रोल ऑपरेटर. ही कार एकटीनेच ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचली.

टेक्सासमधील गिगाफॅक्टरीमधून डिलीव्हरीला सुरू झाली आणि अवघ्या ३० मिनिटांत कारने ग्राहकाच्या घरापर्यंतचा प्रवास केला. यामध्ये हायवे, शहरातील रस्ते, सिग्नल, स्टॉप साईन्स अशा अनेक अडथळ्यांचा कारने अत्यंत कुशलतेने सामना केला. अखेरीस, कार स्वत:हून ग्राहकाच्या इमारतीखाली जाऊन पार्क झाली.
टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांनी या ऐतिहासिक क्षणाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (पूर्वीचे ट्विटर) X वर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, ही डिलिव्हरी एक दिवस आधीच पूर्ण करण्यात आली. टेस्लाने संपूर्ण ३० मिनिटांचा प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मागील सीटवरून शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये, कारने कशा प्रकारे स्वत:हून रस्ता पार केला, सिग्नल पाळले आणि ट्रॅफिकमध्ये निर्णय घेतले, हे स्पष्ट दिसून येते.