बीजिंग : News Network
Humanoid Robots Football Match | चीनच्या पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने गेल्या काही वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघाचे चाहते देखील निराश झाले आहेत. या निराशेच्या गर्तेत आता मैदानावर उतरलेल्या Humanoid Robot च्या (मानवासारखे दिसणारे रोबोट) संघाने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. बीजिंगमध्ये नुकताच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा, पूर्णपणे स्वायत्त असा रोबो फुटबॉल सामना पार पडला, ज्याची चर्चा खेळापेक्षा त्यातील तंत्रज्ञानामुळे अधिक होत आहे.

चीनच्या राजधानीत प्रथमच आयोजित या स्पर्धेत चार Humanoid Robot संघांनी ३-विरुद्ध-३ सामने खेळले. हे सामने आगामी World Humanoid Robot Games ची एक झलक मानली जात आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात मानवी हस्तक्षेप अजिबात नव्हता; सर्व रोबोटकेवळ एआयच्या मदतीने स्वत:चे निर्णय घेत होते आणि रणनीती आखत होते. या रोबोटमध्ये प्रगत व्हिज्युअल सेन्सर्स बसवण्यात आले होते, ज्यामुळे ते चेंडू ओळखू शकत होते आणि मैदानात वेगाने हालचाल करू शकत होते. पडल्यानंतर स्वत:हून उभे राहण्याची क्षमताही त्यांच्यात होती. तरीही, सामन्यादरम्यान काही रोबोटस् स्ट्रेचरवरून बाहेर घेऊन जावे लागले, ज्यामुळे या अनुभवाला एक वेगळाच वास्तववादी स्पर्श मिळाला.
चीन सध्या AI शक्तीवर चालणा-या Humanoid Robot च्या विकासावर भर देत आहे. फुटबॉल, मॅरेथॉन आणि बॉक्सिंग यांसारख्या स्पर्धांचा वापर त्यांच्या चाचणीसाठी केला जात आहे. रोबोट पुरवणा-या कंपनीच्या मते, भविष्यात माणसे आणि रोबोट एकत्र खेळू शकतील, यासाठी त्यांची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे आहे. अंतिम सामन्यात त्सिंगहुआ विद्यापीठाच्या संघाने चायना ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संघाचा ५-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. एकीकडे मानवी संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असताना, दुसरीकडे या रोबोटच्या खेळाने मात्र चाहत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे.