बंगळुरू : News Network
Congress MLA wants remove CM | कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एका काँग्रेस आमदाराने केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते रणदीप सिंह सुरजेवाला बंगळुरु दौ-यावर आहेत. याआधीच या आमदाराने विधान केले. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या जवळच्या आमदाराने मोठा दावा केला आहे.

१०० आमदारांना आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बदल हवा आहे, असे मोठे विधान या आमदाराने केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवून डीके शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, अशी काही आमदारांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. जर आता बदल झाला नाही तर २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता धोक्यात येऊ शकते, असं सांगत काँग्रेसचे आमदार इक्बाल हुसेन यांनी उघडपणे डीके शिवकुमार यांना पाठिंबा दिला.
आमदार इक्बाल हुसेन म्हणाले, हे फक्त माझे मत नाही, १०० हून अधिक आमदारांना बदल हवा आहे. अनेक आमदार या क्षणाची वाट पाहत आहेत. त्यांना सुशासनाची आशा आहे आणि डीके शिवकुमार यांना संधी मिळायला हवी असा त्यांचा विश्वास आहे. कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला कर्नाटकात पोहोचले आहेत. त्यांनी ही भेट संघटनात्मक असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सलग दुस-या दिवशी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसोबत बैठक सुरू ठेवली आहे.