कराची : News Network
Pakistani Donkey | पाकिस्तानमध्ये यावर्षी गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या ६०.८ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५९ लाखांवर होती. तर, चीनमध्ये पाकिस्तानी गाढवांच्या कातडीची आणि मासांची मागणी सतत वाढत आहे. चीनमध्ये गाढवांच्या कातडीचा वापर करून पारंपरिक औषधे बनवली जातात. त्यामुळे चीन पाकिस्तानकडून गाढवांची खरेदी करत आहे. तर, पाकिस्तानने देखील गाढवांच्या उत्पादनात बरीच गुंतवणूक केली आहे.

पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत सलग तिस-या वर्षी वाढ झाली आहे. चीनमधील पारंपरिक हर्बल औषधांमध्ये गाढवाचा वापर केला जातो. गाढवाच्या कातडीपासून बनवलेले इजियाओ नावाचे औषध त्वचा, रक्त, पुरूषांचे लैंगिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
चीनमध्ये इजियाओची मागणी!
चीनमध्ये इजियाओच्या वाढत्या मागणीमुळे दरवर्षी लाखो गाढवे मारली जातात. इजियाओची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चीनला दरवर्षी सुमारे ५९ लाख गाढवांची कत्तल करावी लागते. यासाठी चीनने स्वत:चे कत्तलखाने सुरू केले आहेत. गाढवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चीन पाकिस्तानवर सतत दबाव वाढवत आहे. चीनमध्ये जवळपास ३००० वर्षांपासून इजियाओचा वापर केला जात आहे. त्यामुळे चीनमध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.