विजयपुरा : News Network
कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. ही घटना २३-२५ मे दरम्यान घडली. मात्र या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरू आहे.

विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबर्ही यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने हे २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान, चोरण्यात आले होते. आम्ही आरोपींना पकडण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. तसेच या गुन्ह्यामध्ये ६ ते ८ लोक सहभागी असल्याचा आम्हाला संशय आहे. तर आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले की, ही चोरी पूर्वनियोजित असावी. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी एका लाँग विकेंडची वाट पाहिली. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील सोन्यावर डल्ला मारला.
पोलीस अधिका-यांनी पुढे सांगितले की, चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी बनावट चावीचा वापर केला. त्यांनी अलार्म बंद केला. तसेच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद केले. तसेच चोरटे बँकेतील नेटवर्क व्हिडीओ रेकॉर्डरसुद्धा घेऊन गेले. त्यांनी केवळ बँक लॉकर उघडले आणि त्यातील सोनं घेऊन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळी एक काळ्या रंगाली बाहुली ठेवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.