एकलकोंडेपणा हे शनीचे वैशिष्टय आहे. शनीच्या अंमलाखालील व्यक्ती मितभाषी असतात, वायफळ बडबड करणार नाहीत. बुध चंद्र शुक्राचा माणूस गप्पा मारेल. त्रासाचे अंतिम टोक शनी देतो तसेच ऐश्वर्याची खैरात करणारही शनीच आहे. साडेसातीत शनी माणसाला जागेवर आणतो, नव्हे त्याची लायकी दाखवून देतो.

चंद्र म्हणजे मन आहे. त्या मनाला जगाचा पूर्ण अनुभव देऊन सत्याची दुनिया दाखवणारा शनी आहे. चंद्र म्हणजे माया आणि शनीला मायेचा तिटकारा आहे आणि म्हणून तो चंद्राला साडेसाती लावतो. कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे हे शनीचे सूत्र आहे. चिकाटी, संयम, चिवटपणा, चिकित्सा, प्रगल्भता शनीकडे आहे आणि प्रत्येक गोष्ट का आणि कशी ते शनीच आपल्याला दाखवत असतो. शनी हा थंडपणाचा ग्रह आहे. गुरूसारखा हा ज्ञानी नसून तत्वनिष्ठ आहे.
साडेसाती म्हणजे चंद्राचा शनीकडून झालेला अस्त आहे. साडेसातीत मनाचा अस्त होतो, बुद्धीचा पराभव होतो आणि अहंकाराचा नाश होतो. साडेसातीत माणूस अक्षरश: नव्याने घडताना दिसतो. साडेसातीत सद्विचार करून नितीमत्तेने चांगले आचरण केले तर नक्कीच भरभराट होते आणि चुकीचे अनीतीने घेतलेले निर्णय अधोगतीस कारणीभूत ठरतात.
पत्रिकेत ६, ८, १० आणि १२ ह्या स्थानाचे कारकत्व शनीकडे आहे. षष्ठ हे दशमाचे भाग्य आहे. म्हणजेच कर्माचे भाग्य म्हणून षष्ठ स्थानाकडे पहिले जाते. कर्माची सुरूवात इथेच आहे. शत्रू इथेच निर्माण होतात पण इथेच आपल्या संयमाची कसोटी लागते.
आपल्या हाताखालच्या लोकांना खुश ठेवाल तर शनी खुश राहणार आहे, कारण चतुर्थ श्रेणी शनीच्या खाली येते. षष्ठ स्थान हे रोगाचे स्थान आहे. मनुष्याला आजार होतो याचाच अर्थ त्याचे चुकीचे कर्म त्याच्यासमोर आजाराच्या रुपात उभे राहते. आजार झाला तर त्या यातना ज्याच्या त्यालाच भोगाव्या लागतात. त्यात कुणीही वाटेकरी होऊ शकत नाही. अष्टम स्थानाचा कारक शनी आहे आणि मृत्यूचा कारकही शनीच आहे. अध्यात्माचा कारकही शनीच आहे. मोक्ष त्रिकोणातील मध्य म्हणजे अष्टम स्थान आहे. आसक्तीचा नाश शिकवणारे हे स्थान आहे.
दुस-याला त्रास देऊन, दुखी करून योग्य मोबद्ल्यापेक्षा जास्त मिळालेला पैसा हा आरोग्य बिघडवून दवाखान्यात जिरवण्याचे काम शनीच करतो. दशम स्थान हे लग्नाच्या खालोखाल असलेले स्थान. आपले कर्तृत्व आणि कर्तव्य जपायला सांगणारे हे स्थान आहे. प्रत्येक माणसाची कार्य करण्याची धमक इथूनच आपल्याला समजते.
शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि वैराग्याशिवाय मोक्ष नाही. मृत्यूपासून मोक्षापर्यंत नेण्याचे कार्य अष्टमस्थानातून आणि व्ययातून होते. व्ययस्थान तसेच गुंतवणुकीचे स्थान आहे. गुंतवणूक पैशाची असो अथवा पुण्याची ती करावीच लागते. पैशाची योग्य गुंतवणूक आयुष्य सुरक्षित करते. तसेच योग्य ठिकाणी केलेले दान आपले पुढील जन्माचे संचित सुरक्षित करत असतो आणि हे शनीच करत असतो. शनीच्या दोन्ही राशी ह्या उदित गोलार्धात आहेत. कर्माच्या शेजारीच लाभ आहेत. जसे कर्म करणार तसे फळ मिळणार हे सांगणारे म्हणून दशमाच्या शेजारी लाभस्थान ठेवलेले आहे.
माणसाच्या गुडघ्यात शक्ती लागते ती शनी देतो. ज्यांचे गुडघे दुखतात ज्यांना पावलागणिक चालता येत नाही त्यांना यातना होतात. गुडघा म्हणजे मकर रास आणि गुडघे दुखतात तिथे शनी असतो. म्हणूनच शनीचा कर्मयोग समजून घेतला पाहिजे.
पत्रिकेमधल्या शनीच्या चांगल्या वाईट स्थितीवरून जातकाच्या अंत:करणाचे दालन समजते. शनी पत्रिकेचा समतोलपणा बिघडवतो. जितका शनी शुभ तितके दु:ख कमी आणि जितका शनी अनिष्ट तितके दु:ख अधिक हे समीकरण आहे. जेव्हा जन्म शनी स्तंभी असतो तेव्हा तो व्यक्तीला स्थिरत्व देतो. जातक कुठलाही बदल करण्यास तयार होत नाही.
ज्यावेळी गोचर भ्रमण करताना शनी आपल्या जन्म अंशावरून जातो तो काळ अनिश्चिततेचा असतो हे नक्की. शनीवरून शनी जाणे, चंद्रावरून रविवरून शनीचे भ्रमण तसेच चंद्राच्या समोरून शनी जाणे हे त्रासदायक असते. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा तो त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही त्यामुळे जातकाला असुरक्षित वाटते. मानवाला काळाची सुस्पष्ट ओळख करून देणे हे शनीचे कारकत्व आहे. स्तुतीला किंवा खोट्या आराधनेला शनी कधीही भुलत नाही आणि भीतीपोटी केलेल्या नमस्कार त्याला रुचत नाही.
गोचरीचा शनी हा त्याच्या ६ व्या भावाला नेहमी त्रास देत असतो. सेवा करणे, जबाबदारी स्वीकारणे आणि कर्तव्य निभावणे ह्यासाठी शनीमहाराज सारखे काहीतरी सांगत असतात, कर्म करा. शनीमहाराज निर्णय घ्यावा अशी स्थिती निर्माण करतात. कित्येक पिढ्यांना पुरेल इतकी पुंजी देण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. सर्व अडचणींवर मात करणे, सहनशीलतेचा कळस गाठणे आणि मोठ्या समुदायाचे नेतृत्व करणे हे शनीकडे आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे यजमानत्व हे शनीकडे आहे . एकत्र कुटुंब पद्धतीत जो घरातील मोठा माणूस असतो तो आपल्याला कठोर भासतो, त्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात त्याच्याकडे एक शिस्त असते आणि तो मनुष्य कुणाला आवडत नाही हे कारकत्व शनीचे आहे.
शनीचे वय ३५ हे आहे पण वय वर्षे ५२ नंतर शनीचा अंमल आपल्याला दिसतो. ३५ ते ४२ ही शनीची वर्षे आहेत. ४, ८, १२ ह्या राशीमध्ये शनीची स्वत:ची नक्षत्रे आहेत. शनी आपल्या स्वत:च्या राशीत जितके फ देत नाही तितके फळ शनी त्याच्या स्वत:च्या नक्षत्रात देतो. ४, ८, १२ मध्ये शनी त्याच्या स्वत:च्या नक्षत्रात उत्तम फळ देतो.
आपल्या उदरात पोटामध्ये शनी आहे आणि आपल्या नाभीत रवी आहे. त्यामुळे उदराचा संकोच म्हणजे शनीचा संकोच आहे. जेव्हा मनुष्य लयबद्ध कपालभाती करतो तेव्हा शनीचा संकोच होतो आणि रविचे नाभितील तत्व हे ऊर्ध्वमुख होते आणि मनाचा चंद्रमा आहे तो अंतर्मुख होतो. त्यामुळे कपालभाती हा साडेसातीवरील एक उत्तम उपाय आहे. आपल्या शरीरातील रवितत्व चेतवणे हे काम कपालभाती करते.।। जय शनिदेव।।