Special Story
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली असून, युवा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ताे भारताचा 35 वा कसोटी कर्णधार ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आता शुभमन गिलच्या कर्णधारपदाने भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. गिल इंग्लंडच्या आव्हानाला कसे सामोरे जाईल आणि WTC मध्ये भारताला कशा पद्धतीने पुढे नेईल, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही नावे कायमस्वरूपी कोरली गेली आहेत. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 34 कर्णधारांनी संघाचे नेतृत्व केले आहे. सी. के. नायडू यांनी 1932 मध्ये भारताचा पहिला कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. यानंतर सुनील गावस्कर, कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. या दिग्गजांनी भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर यशाच्या शिखरावर नेले. तर रोहित शर्मा हा अलीकडील कर्णधार होता.आता, 2025 मध्ये, एक नवे नाव या यादीत सामील होत आहे. शुभमन गिल. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचा 35 वा कर्णधार म्हणून नियुक्त झालेला हा युवा तारा इंग्लंड दौऱ्यावर (20 जून 2025 पासून) भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात करणार आहे.
बीसीसीआयने दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून 25 वर्षीय शुभमन गिलवर विश्वास दाखवला आहे. गिलने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांच्याशी झालेल्या बैठकीत कर्णधारपदाबाबत चर्चा केली होती, जिथे त्याला नेतृत्वाची जबाबदारी देण्याचे संकेत मिळाले होते.काही तज्ज्ञांनी गिलच्या फलंदाजीच्या सातत्यावर प्रश्न उपस्थित केले असले, तरी त्याच्या नेतृत्व कौशल्यावर निवड समितीचा पूर्ण विश्वास आहे. गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे यशस्वी नेतृत्व केले असून, 2025 च्या हंगामात 10 पैकी 7 सामने जिंकून त्याने आपली क्षमता सिद्ध केली
शांत नेतृत्वाचा नवा चेहरा
पंजाबच्या फझिल्का येथे जन्मलेला शुभमन गिल हा केवळ एक तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण फलंदाजच नाही, तर शांत आणि संयमी स्वभावाचा रणनीतीकार आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सला 10 पैकी 7 सामने जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवून दिले, तर झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-20 मालिकेत 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 25 सामन्यांत 1492 धावा (4 शतके, 6 अर्धशतके) केल्या असून, त्याच्या फलंदाजीतील सातत्य आणि नेतृत्वातील प्रगल्भता यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर कसोटी कर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघ पुनर्रचनेच्या टप्प्यातून जात आहे. अशा वेळी गिलसारखा युवा आणि उत्साही कर्णधार संघाला नवे दिशादर्शन देण्यास सक्षम आहे. त्याचा शांत स्वभाव, खेळपट्टीवरील परिस्थितीचे आकलन आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची कला यामुळे तो संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंना एकत्र बांधण्यात यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे.
– SHRIPAD SABNIS | Chief Editor, khabarbat.com