वॉशिंग्टन : News Network
माणसाला सदैव जिवंत राहण्याची इच्छा असते; पण म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू कुणाला चुकलेला नाही. आता गूगलचे माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध भविष्यवक्ता रे कुर्जवील यांनी सनसनाटी दावा केला आहे. २०३० पर्यंत नॅनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. ७५ वर्षीय कुर्जवील यांनी आतापर्यंत १४७ भविष्यवाण्या केल्या. त्यापैकी ८६ टक्के ख-या ठरल्या. टेक व्लॉगर अडाजियो यांच्या यूट्यूब मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्समधील प्रगती माणसाचे आयुष्य कायमचे बदलेल. हे तंत्रज्ञान मृत्यूला हरवेल आणि अमरत्व शक्य करेल.


नॅनोरोबोट्स म्हणजे अत्यंत सूक्ष्म रोबोट्स. त्यांचा आकार ५० ते १०० नॅनोमीटर इतका लहान असतो. सध्या संशोधनात यांचा उपयोग डीएनए प्रोब्स, सेल इमेजिंग आणि औषध पोहोचवण्यासाठी होतो. कुर्जवील यांच्या मते, लवकरच हे नॅनोरोबोट्स रक्तप्रवाहातून शरीरात फिरतील. ते पेशी दुरुस्त करतील, वृद्धत्व आणि आजारांना थांबवतील. इतकेच नाही, तर हे तंत्रज्ञान शरीराला हवे तसे अन्न खाण्याची मुभा देईल. नॅनोरोबोट्स रक्त आणि पचनसंस्थेतून गरजेचे पोषक द्रव्ये घेतील आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतील. हे सर्व वायरलेस नेटवर्कद्वारे नियंत्रित होईल.
२०४५ पर्यंत माणूस ‘एआय’ सोबत एकरूप होऊन आपली बुद्धिमत्ता अब्जपटीने वाढवेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. २०१२ मध्ये गूगलचे सहसंस्थापक लैरी पेज यांनी कुर्जवील यांना मशिन लर्निंग आणि भाषा प्रक्रिया प्रकल्पांसाठी नियुक्त केले. त्यांची जबाबदारी एका वाक्यात स्पष्ट केली : ‘गूगलची भाषा समजण्याची क्षमता सुधारणे.’ कुर्जवील यांनी गूगलमध्ये मोठ्या भाषा मॉडेल्सच्या विकासात योगदान दिले. त्यांनी २,००,००० पुस्तके वाचून प्रश्नांची उत्तरे देणारी ‘एआय’ तयार करण्यात मदत केली. सध्या ते गूगलमध्ये सल्लागार म्हणून काम करतात आणि ‘एआय’ संशोधनाला दिशा देतात.