रियाध : News Network
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियाच्या दौ-यावर आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये त्यांनी एका जनसभेला संबोधित केलं. तिथे त्यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती टाळण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. ट्रम्प यांनी याला ऐतिहासिक सीजफायर म्हटलं. सोबतच त्यांनी दावा केला की, हा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी व्यापारीक दबावाचा वापर केला. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा ट्रम्प यांनी अशा पद्धतीचा दावा सार्वजनिकरित्या केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधीच ट्रम्प यांचा ट्रेड प्रेशरचा हा दावा फेटाळून लावला.

काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमधील वाढता संघर्ष रोखण्यासाठी ऐतिहासिक शस्त्रसंधी घडवून आणली. यामध्ये मी व्यापाराचा वापर केला. मी म्हटलं, मित्रांनो, चला करार करु. मिसाईल्सची नको, सुंदर वस्तूंची देवाणघेवाण करु. दोन्ही देशांचे नेते सशक्त, बुद्धिमान आणि समजदार आहेत. हा संघर्षविराम दीर्घकाळ चालेल अशी मला अपेक्षा आहे, असं डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियातील आपल्या भाषणात म्हणाले.
भारत-पाकिस्तानमध्ये जी युद्धबंदी झाली, त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सीनेटर मार्को रुबियो आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांचे आभार मानले. भाषणा दरम्यान त्यांनी रुबियोकडे इशारा केला. ‘मार्को, उभी रहा, तू शानदार काम केलं आहेस. कदाचित आपण दोन्ही देशांना एकत्र डिनरला पाठवू. हा संघर्ष थांबला नसता, तर लाखो लोकांचे प्राण गेले असते. कारण एका छोट्या हल्ल्यापासून सुरु होऊन सतत हे वाढत होतं’ असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.