नवी दिल्ली : प्रतिनिधी
हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भातामध्ये आर्सेनिकची पातळी वाढू शकते. त्यामुळे आशियाई देशांतील लोकांमध्ये कर्करोग आणि आरोग्यविषयक धोके वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण जमिनीच्या रासायनिक घटकांमध्ये बदल घडवत आहेत, ज्यामुळे धान्यांमध्ये आर्सेनिक अधिक प्रमाणात शोषले जाते.

१० वर्षांच्या कालावधीत २८ भात वाणांवर तापमान व कार्बन डायऑक्साईडच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. भारत, बांगला देश, चीन, म्यानमार, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम या सात आशियाई देशांतील आरोग्य धोके आणि संभाव्य कर्करोग प्रमाण वाढू शकते. तापमान आणि कार्बन डायऑक्साईड एकत्र येऊन आर्सेनिक पातळी वाढवतात, असे स्पष्ट झाले. २०५० मध्ये चीनमध्ये १.३४ कोटी जणांना भातातील आर्सेनिकमुळे कर्करोग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
भात पिकवण्यासाठी वापरली जाणारी प्रदूषित माती आणि सिंचनाचे पाणी आर्सेनिकची मात्रा वाढवते. स्वयंपाकाच्या पाण्यातूनही भातात आर्सेनिक शोषले जाऊ शकते.