नवी दिल्ली : प्रतिनिधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शनिवारी (दि.१९) जेईई मेन २०२५ सत्र- २ चा निकाल जाहीर केला. JEE Main २०२५ सत्र-२ ची परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान एनटीएद्वारे घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची १८ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. आता जेईई मेन २०२५ सत्र २ चा निकाल NTA ने अधिकृत पोर्टलवर जारी केला आहे. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत.

देशातील २४ टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सानिध्य सराफ, विशाद जैन यांचा समावेश आहे. या वर्षी १०० पर्सेंटाईल गुण मिळवणा-या २४ टॉपर्समध्ये दोन महिला उमेदवार आहेत. पश्चिम बंगालमधील देवदत्त माझी आणि आंध्र प्रदेशातील साई मनोगना गुठीकोंडा यांचा त्यात समावेश आहे. तर उर्वरित २२ पुरुष उमेदवार आहेत. (latest news)
जेईई मेन सत्र २ पेपर १ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी cutoff १०० ते ९३.१०२३२६२ आहे. JEE Main २०२५ सत्र-२ पेपर १ परीक्षेत सुमारे ९७,३२१ उमेदवारांनी उत्तीर्ण पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. जेईई मेन सत्र-२ पेपर १ परीक्षेसाठी एकूण १०,६१,८४० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९२,३५० उमेदवारांनी परीक्षा दिली. जानेवारी २०२५ च्या सत्र १ परीक्षेत १३,११,५४४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १२,५८,१३६ उमेदवार परीक्षेला बसले होते.