नवी दिल्ली : प्रतिनिधी
दिल्ली आणि NCR च्या काही भागाला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प झाली. शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले. यामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला.

शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवार सकाळपर्यंत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणा-या सुमारे ५० देशांतर्गत विमानांना विलंब झाला. तर सुमारे २५ विमानांचा मार्ग बदलण्यात आला. धुळीच्या वादळामुळे सात विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी या झालेल्या गैरसोयीबद्दल सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. अनेक प्रवाशांनी बोर्डिंग गेटवरील गर्दी आणि विमान कंपन्यांच्या कर्मचा-यांकडून झालेल्या गैरवर्तनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विमानतळावर मोठा गोंधळ उडाला असून चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
विमानतळावरील सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटे एकाचवेळी मार्ग बदललेल्या आणि उशिराने उतरणा-या विमानांमुळे बोर्डिंग गेट्सवर अचानक गर्दी वाढली. धुळीच्या वादळानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक विमाने उड्डाणे वळवण्यात आली आणि रद्द करण्यात आली. यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांची गैरसोय झाली. ज्या विमानांचा मार्ग बदलण्यात आला त्यांना दिल्लीत पोहोचण्यास उशीर लागला. यामुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.