परळी : प्रतिनिधी
आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडची मक्तेदारी ही परळीतील अवैध राख उपसा, वाहतुकीच्या ठिकाणी होती, असा आरोप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी केला होता. त्यामुळे तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता; पण आता हीच मक्तेदारी मोडीत निघाली आहे.

गेल्या २ एप्रिलपासून पोलिस बंदोबस्तात थर्मलमधून निघालेली राख उचलली जात आहे. या ठिकाणी २४ तास खासगी व पोलिस असा १८ लोकांचा बंदोबस्त तैनात आहे. राख उपसा करण्यासाठी २०२३ मध्ये १८ जणांनी निविदा व त्याची रक्कमही भरली होती. २०२४ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात २ एप्रिल रोजी राखेचा उपसा करण्यास त्यांना परवानगी दिली. त्यानुसार १८ जणांनी राख उचलणे सुरू केले आहे.
दाऊतपूर राख तलाव (बंधारा) मधील ५० टक्के कोट्यातील राख साठा उचलण्यासाठी १८ एजन्सी पात्र असून राख उपसा पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पबाधित गावाच्या लोकांसाठी २० टक्के राख साठा राखीव असून, त्यासाठी १५० जणांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.