धुळे : प्रतिनिधी
राज्यातील शालेय शिक्षकांना सोपविली जाणारी अशैक्षणिक कामे शिक्षण विभागाच्या वतीने लवकरच कमी करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षण विभागाच्या स्तरावरुन प्रयत्न करुन पुढील वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा झाल्याचे पाहायला मिळेल असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
मंत्री दादा भुसे हे आज धुळे दौ-यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा जाणून पुढील काळात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांची अशैक्षणिक कामे लवकरच कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येईल असेही भुसे म्हणाले.
हे पण वाचा…. ‘Trade war’ मुळे TV, फ्रिज, Mobile, इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात स्वस्त होणार!
विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत देण्यात घेणारे गणवेश हे लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील. यंदा १५ जूनला शाळा उघडल्यावर विद्यार्थी गणवेशात आलेले दिसतील अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही लागल्या तर या निवडणुकामध्ये महायुती मोठ्या संख्येने विजयी होईल, असा विश्वास देखील दादा भुसे यांनी व्यक्त केला. शिक्षकांना अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. मात्र, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणे हे शिक्षकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यांची अशैक्षणिक कामे लवकरच कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात येईल अशी माहिती देखील दादा भुसे यांनी दिली आहे.